ब्रह्मपुरी- येथील एका ‘एमबीबीएस’ पदवीधर तरुणीने वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीने प्रथम नदीत उडी घेतली. पाणी कमी असल्याने ती बचावली, मात्र पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. ईशा घनश्याम बिंजवे (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती ब्रह्मपुरी येथील रहिवाशी आहे.
तीने नदीच्या पुलावरून उडी घेतली. नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली. मात्र, आत्महत्या करण्याचा निश्चय करून आल्याने तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली. यावेळी मात्र पाणी अधिक असल्याने ती वर आलीच नाही. या घटनेचा पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या काहींनी व्हिडीओ काढला. मात्र, वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. घटनेनंतर पोलिसांनी तिचा मृतदेह काढला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.