चंद्रपूर – आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या काळात पूरपीडितांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. मात्र काँग्रेस कडून जिल्ह्यात पूरस्थिती असताना पूरग्रस्तांच्या मदतीऐवजी खासदारांचे सत्कार सोहळे करण्यात काँग्रेस मग्न आहे.
दुसरीकडे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लागोपाठ दोन दिवस भर पावसात त्यांनी पूरपीडितांच्या भेटी घेतल्या. पूरपीडितांच्या समस्या एकून घेतल्या व पूरग्रस्त चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे बुधवारी भेट दिल्यानंतर गुरूवारी पालकमंत्री पोंभुर्णा तालुक्यातील चार पूरगस्त गावांमध्ये पोहचले. पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव , वेळवा, आष्टा आणि बल्लारपूर (चेक) या पूरग्रस्त गावांचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. मात्र जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तथा काँग्रेसच्या सर्व संघटनांच्यावतीने चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर व गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या सत्कार सोहळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन स्थानिक जिजाऊ लॉन येथे शनिवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता. दुसरीकडे, या सत्कार साेहळ्याच्या आयोजनाची तयारी सुरू झाली तेव्हापासूनच जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशावेळी पूरग्रस्तांची मदत करण्याऐवजी काँग्रेसकडून सत्कार सोहळे आयोजित केले जात आहे, अशी टीका काँग्रेसशी संबंधित पदाधिकाऱ्यांकडूनच समाज माध्यमावर केली जात आहे. या सोहळ्याकडे शहर काँग्रेस अध्यक्ष रामू उर्फ रितेश तिवारी, पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील गटबाजी समोर आली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार धोटे यांना याबाबत विचारणा केली असता, कार्यक्रमाला विद्यमान शहराध्यक्ष अनुपस्थित असले तरी माजी शहराध्यक्ष उपस्थित होते, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. शहराध्यक्ष रामू तिवारी यांना विचारले असता, काकांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, असे सांगितले. मात्र, शहराध्यक्षांची अनुपस्थिती खटकणारीच होती, असे काँग्रेस पक्षाशी संबंधित अनेकांचे म्हणणे आहे.