चंद्रपूर : शहरातील बिनबा गेट परिसरात असलेल्या शाही दरबार या हॉटेलमध्ये दुपारच्या सुमारास जेवण करीत असताना घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी अली सरवर याच्यावर पाच अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याचेवर चाकूने हल्ला केला. सदर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हाजी शेखला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सोमवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने चंद्रपूर शहर पुन्हा हादरून गेले आहे. या घटनेतील पाच आरोपींनी एलसीबीकडे आत्मसमर्पण केले आहे. हाजी अलीची हत्या ही जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समजते. घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर अली हा आपल्या साथीदारासह सोमवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर शहरात बिनबा गेट जवळ असलेल्या शाही दरबार हॉटेलमध्ये आपल्या साथीदारासह जेवण करीत होता. काही वेळानंतर त्याच्या पाळतीवर असलेले पाच युवक येथे आले आणि त्यांनी स्वतःकडे असलेल्या बंदुकीतून हाजी अलीवर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा शिवा नावाचा साथीदार जखमी झाला. हाजी अली हॉटेलमधून पळून जाण्यासाठी धावला असता आरोपींनी त्याच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात हाजी अली गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत हाजी शेखला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती प्राप्त होताच हाजीचे समर्थक मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके हे पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. हाजी अलीवर प्राणघातक हल्ला करून आरोपी नीलेश उर्फ पिंटू नामदेवराव ढगे (३६, रा. रमना मारोती, नंदनवन, नागपूर), श्रीकांत अशोक कदम (३२, रा. दिग्रस), प्रशांत उर्फ पस्सी राजेंद्र माटवेणी (२७, रा. नकोडा), राजेश रमेश मुलकळवार (२५, रा. नकोडा) आणि प्रमोद मधुकर वेळोकार शेख उर्फ समीर शेख सरवर (४०, रा. दिग्रस) या पाच आरोपीनी एलसीबीकडे आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. हाजी अली याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याने कोळसा व रेती तस्करीमध्ये आपला दरारा निर्माण केला होता. त्याची मागील पाश्र्वभूमी गुन्हेगारीची असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. हाजी अलीची हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.