चंद्रपूर, 4 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या प्रस्तावित विस्तारावर प्रचंड आक्रमक विरोध झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी तातडीने दखल घेतली आहे. स्थानिक नागरिकांनी पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक गंभीर परिणामांची शक्यता व्यक्त करून या प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवला होता. मंत्री यादव यांनी या विरोधाचे गांभीर्य लक्षात घेत त्यावर तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वराज्य रक्षक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मनोज पोतराजे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो स्थानिक नागरिकांनी दिलेल्या निवेदनामध्ये विस्ताराच्या संभाव्य परिणामांवर जोरदारपणे आक्षेप नोंदवले. 30 सप्टेंबर रोजी आयोजित सार्वजनिक सुनावणीदरम्यानही प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.
निवेदनातील कठोर मुद्दे:
1. वायूप्रदूषणाचा प्रचंड धोका: लॉयड मेटल्सच्या विद्यमान प्रकल्पामुळे चंद्रपूर परिसरातील प्रदूषणाची पातळी धोक्याची झाली आहे. PM10 आणि PM2.5 या घातक कणांमुळे चंद्रपूरच्या हवेचे गुणवत्ता सूचकांक (AQI) सातत्याने खराब होत आहे. प्रस्तावित विस्तारामुळे सल्फर डायऑक्साईड (SO₂), नायट्रोजन ऑक्साईड्स (NOₓ), आणि कार्बन मोनोक्साईड (CO) यांसारख्या अत्यंत धोकादायक वायूंचा उत्सर्जन होईल, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे गंभीर विकार होण्याचा धोका आहे.
2.पाण्याच्या प्रदूषणाचा अनियंत्रित धोका: लॉयड मेटल्सच्या औद्योगिक सांडपाण्यामुळे पिण्याचे पाणी आणि जलस्रोत आधीच दूषित झाले आहेत. स्थानिक जलस्रोतांमध्ये प्रचंड प्रदूषण असून, या विस्तारामुळे जलप्रदूषणात वाढ होईल आणि जनतेचे आरोग्य धोक्यात येईल.
3.शेती आणि मातीच्या गुणवत्तेवर प्रचंड परिणाम: औद्योगिक कचऱ्यामुळे मातीची उत्पादकता खालावत आहे. प्रकल्पाच्या विस्तारित घातक परिणामांमुळे स्थानिक शेतकऱ्यांची शेती आणि उत्पन्नावर प्रचंड आघात होईल. या विस्तारामुळे शेतीच्या जमिनीची गुणवत्ता आणखी खालावेल, ज्यामुळे शेतकऱ्यांची अर्थिक स्थिती खिळखिळी होईल.
4. सार्वजनिक आरोग्याचे गंभीर परिणाम: प्रदूषणामुळे आधीच स्थानिकांमध्ये श्वसनाच्या विकारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्वचेचे आजार, अस्थमा, आणि इतर आरोग्याच्या समस्या वेगाने वाढत आहेत. प्रस्तावित विस्तारामुळे या समस्या आणखी तीव्र होऊन स्थानिकांचा जगणे असह्य होईल.
तत्काळ चौकशीचे आदेश: स्थानिकांच्या विरोधाचे गांभीर्य लक्षात घेऊन भूपेंद्र यादव यांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाच्या पातळीवर या प्रकल्पाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिकांनी आपल्या हक्कांसाठी दिलेला संघर्ष आता परिणामकारक होण्याच्या मार्गावर आहे.
मनोज पोतराजे यांची ठाम भूमिका: “लॉयड मेटल्सच्या या विनाशकारी विस्ताराला आमचा ठाम विरोध आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्यावर होणारा आघात सहन करणार नाही. आम्ही सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करू,” असे स्पष्ट शब्दांत मनोज पोतराजे यांनी सांगितले. “या लढ्यात आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. स्थानिकांचे भविष्य आणि पर्यावरणाचे रक्षण करणे आमची प्राथमिकता आहे.”
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “या प्रकल्पाच्या विस्तारामुळे होणारे सर्व धोक्यांचे निराकरण करून हा प्रकल्प पूर्णतः रोखला पाहिजे,” अशी संतप्त मागणी स्थानिकांनी केली आहे. या निर्णयामुळे आता स्थानिकांचा लढा बळकट झाला असून त्यांनी मंत्री यादव यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्थानिकांनी पर्यावरण आणि आरोग्याच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहून, या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष सुरु ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.