राज्यपालांच्या उपस्थितीत दिलेला शब्द केवळ तीन दिवसांत केला पूर्ण
पोंभुर्णा, दि. ५: राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजासाठी दिलेला शब्द केवळ तीन दिवसांत पूर्ण केला आहे. महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पोंभुर्णा येथे १ ऑक्टोबरला आयोजित आदिवासी मेळाव्यात ना. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले होते. या वचनाला त्यांनी तीन दिवसांत कृतीत उतरवून आदिवासी समाजाच्या मनात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे आदिवासी समाज बांधवांसोबत संवाद साधत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वीर बिरसा मुंडा यांच्या नावाचे महत्त्व अधोरेखित केले. “भगवान वीर बिरसा मुंडा यांनी केवळ आदिवासी समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. त्यामुळे त्यांचे नाव या संस्थेला देणे म्हणजे त्यांची महानता आणि त्यांचा आदर्श पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवणे आहे,” असे ते म्हणाले.
या घोषणेनंतर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाशी त्वरित संपर्क साधला व तीन दिवसांत शासन निर्णय काढून घेतला. ४ ऑक्टोबरला जाहीर झालेल्या शासन निर्णयात पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आदिवासी समाजात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
“माझ्या मते, दिलेला शब्द पूर्ण करण्याची ही जबाबदारी आहे. आदिवासी समाजासाठी हे एक गौरवाचे पाऊल आहे,” असे मुनगंटीवार म्हणाले. त्यांच्या या कृतज्ञतेमुळे पोंभुर्णातील आदिवासी समाजाच्या भावना उंचावल्या आहेत.
शब्द आणि कृतीमध्ये समर्पण:
ना. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच आपल्या वचनपूर्तीसाठी ओळखले जातात. या निर्णयाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची आणि तत्परतेची प्रचिती दिली आहे.