चंद्रपूर, दि. 6 – चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना ‘वाघाचे’ बळ देऊन त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवून देण्यासाठी वनमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा निर्धार व्यक्त केला आहे. स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन स्पर्धे’च्या उद्घाटन प्रसंगी, मुनगंटीवारांनी खेळाडूंना लढण्याची प्रेरणा देत ‘वाघाच्या ताकदीने खेळा’ असा सल्ला दिला.
“आपण वाघांच्या भूमीत आहोत, आणि चंद्रपूरच्या खेळाडूंनीही वाघासारखं बळ दाखवलं पाहिजे,” असं ठामपणे मुनगंटीवार म्हणाले. जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रगतीसाठी अत्याधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. मुनगंटीवार यांच्या या ठाम भूमिकेने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवारांनी जाहीर केलं की, चंद्रपूरच्या बॅडमिंटन सभागृहामध्ये सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून एक नवं युग सुरू केलं जाणार आहे. त्यांनी यासोबतच नव्या बॅडमिंटन स्टेडियमसाठी दहा वातानुकूलित कोर्ट्स उभारण्याची घोषणाही केली. “महाराष्ट्राच्या क्रीडामंत्र्यांनी यासाठी तात्काळ मंजुरी दिली आहे, आणि आम्ही नेहमीप्रमाणे शब्द पाळू,” असं सांगत त्यांनी आपल्या आत्मविश्वासाची झलक दाखवली.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू माधवी काशीकर हेडाऊ हिचा विशेष सत्कार करून मुनगंटीवारांनी तिच्या यशाचे कौतुक केले. “तुमच्यासारख्या खेळाडूंनी चंद्रपूरचं नाव जगभर पोहोचवलं पाहिजे,” असे त्यांनी खेळाडूंना उद्देशून सांगितले.
या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून तब्बल 520 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे आयोजन गिरीश चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रगतीसाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं मत व्यक्त केलं. “या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी मिळणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुनगंटीवार यांच्या या प्रोत्साहनाने चंद्रपूरच्या खेळाडूंमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील युवा खेळाडूंनी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद दाखवावी, अशी मुनगंटीवारांची इच्छा आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “चंद्रपूरच्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाईल. तुम्ही फक्त तुमच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर लक्ष ठेवा. आम्ही तुम्हाला जिंकण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ.”
मुनगंटीवारांच्या या दृष्टीकोनाने जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात निश्चितच नवा इतिहास घडणार आहे. ‘टायगर’ बनण्याचा निर्धार घेतलेल्या चंद्रपूरच्या खेळाडूंना आता नव्या पंखांनी भरारी घेण्याची तयारी करावी लागेल, असा संदेश त्यांनी दिला.