ऊर्जानगर: नवदुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ ब्रिगेड ऊर्जानगर शाखेतर्फे महिलांचे सक्षमीकरण आणि नारीशक्तीचा जागर यावर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम राबवण्यात आला. रविवार, ६ सप्टेंबर रोजी आंभोरा गावातील श्री सप्तशृंगी माता मंडळ येथे आणि सोमवार, ७ सप्टेंबर रोजी नवदुर्गा मंडळ खैरगाव येथे हा विशेष उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती शितलताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्यांची, विशाखा समितीची, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ॲप्स आणि मदत क्रमांकांची माहिती दिली. ब्रिगेडच्या सदस्यांनी महिलांचे समाजातील स्थान आणि घरातील महत्त्व यावरही प्रकाश टाकला.
कार्यक्रमादरम्यान, पौराणिक देवी-देवतांच्या पूजनासोबतच आधुनिक काळातील महान स्त्रिया, जसे माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले. माँ जिजाऊंनी शिवरायांना स्त्रियांचा आदर आणि सुरक्षेचे धडे दिले. सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले, तर रमाई आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या खंबीर पाठीशी उभे राहून संविधानाच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलला.
या उपक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान मुलींपासून ते ८० वर्षांच्या आजींपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. जिजाऊ ब्रिगेडने गावकऱ्यांचे आभार मानले, ज्यांनी प्रबोधनाची संधी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवमती ममता भालेराव, सरोज अडवे, संगिता जूनारे, सुनिता बाबर, स्विटी सूर्यवंशी, मनीषा आवारी, सायली देठे, तेजस्विनी पाटील, शुभांगी मिलमिले आणि गिताताई गौरकार यांचे विशेष सहकार्य लाभले.