चंद्रपूर: युवासेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी जेष्ठ नागरी संघ सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत अनेक युवकांनी युवासेनेत प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार ही बैठक झाली.
पूर्व विदर्भ विभागीय सचिव व सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत हजेरी लावली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बेलखेडे यांनी या वेळी युवासेनेच्या त्रिसूत्री कार्यक्रमाचा उल्लेख केला. “शिक्षण, आरोग्य, आणि रोजगार या मुद्द्यांना प्राथमिकता देत युवासेना चं कार्य जोमाने सुरू आहे. युवकांना सहकार्य करून पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडावी,” असे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याबद्दल विस्तारक संदीप रियाल (पटेल) यांनी समाधान व्यक्त केले आणि संघटनात्मक बांधणीसाठी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले.
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. “जिल्ह्यात युवासेनेच्या माध्यमातून चांगले कार्य घडविण्याचा आमचा संकल्प आहे,” असे सहारे यांनी सांगितले. बैठकीनंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी युवकांसोबत संवाद साधला आणि त्यांचे मनोबल वाढवले.
बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे युवासेनेत प्रवेश केला. उपस्थितांमध्ये जिल्हा चिटणीस सुमित अग्रवाल, उपजिल्हा प्रमुख बंटी कमटम, तालुका प्रमुख सूरज शेंडे, शहर प्रमुख शहबाज शेख, उपतालुका प्रमुख विवान रामटेके, राजुरा उपजिल्हा प्रमुख कुणाल कुडे आणि अन्य पदाधिकारी यांचा समावेश होता.