मुंबईतील बांद्रा परिसरात आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रख्यात नेते बाबा सिद्दीकी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून हत्या केली. ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी हे 9.15 मिनिटांनी आपल्या कार्यालयातून बाहेर पडत होते. त्यांनी काही क्षण ऑफिसजवळ थांबले असता अचानक फटाके फोडल्याचा आवाज झाला, त्याच वेळी एका गाडीतून तोंडाला रुमाल बांधलेले तीन अज्ञात हल्लेखोर बाहेर पडले आणि त्यांनी थेट सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्यात सिद्दीकी यांच्या छातीत एक गोळी लागली आणि ते लगेचच खाली कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. सध्या या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींचा आधार घेतला जात आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा धक्का बसला असून, बाबासिद्दीकी यांची हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, हल्ल्याच्या काही क्षण आधी फटाक्यांचा आवाज आला, जो हल्लेखोरांना पळून जाण्यासाठी वापरला गेला असावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची तातडीने चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणात संपूर्ण माहिती सादर करण्याची मागणी केली आहे. बाबासिद्दीकी हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि विशेषतः बॉलिवूडमधील मोठ्या इफ्तार पार्ट्यांमुळे ओळखले जात होते. ते बॉलिवूडच्या मोठ्या व्यक्तींशी चांगले संबंध होते, ज्यामुळे त्यांच्या पार्टीत सलमान खान, शाहरुख खान यांसारखे स्टार्स नेहमी हजेरी लावत असत. या घटनेने सिनेमा क्षेत्रातही मोठी हळहळ निर्माण झाली आहे. बाबासिद्दीकी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक सामाजिक प्रकल्प राबवले असून, मुंबईतील गरीब आणि गरजू लोकांसाठी त्यांनी विशेष काम केले होते. त्यांच्या हत्येमुळे अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षातील नेत्यांनी या हत्येचा तीव्र निषेध केला आहे आणि आरोपींना तातडीने शिक्षा देण्याची मागणी केली आहे.