चंद्रपूर : चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधील स्थापत्य विभागात गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला भ्रष्टाचार आता प्रकाशझोतात येत आहे. या विभागात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांची प्रतीनियुक्ती आणि त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या गैरव्यवहारांमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. २००७ पासून एकाच ठिकाणी प्रतीनियुक्तीवर ठेवण्यात आलेले गौरी, बगडे, पेटकर या कर्मचाऱ्यांमुळे विभागातच गोंधळ निर्माण झाला आहे. या कर्मचाऱ्यांना एकाच विभागात कायम ठेवल्यामुळे त्यांना आर्थिक लाभ घेण्याची संधी मिळत असल्याचा आरोप होतो आहे.
या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये साटंलोटं सुरु असून, या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. मर्जीतील कंत्राटदारांना कामे देऊन अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामे केली जात असल्याचे आरोप होत आहेत. ॲशबंड आणि ॲशबंडकडे जाणारे रस्ते, नदीवरील पूल, नालेसफाई, नाली खोलीकरण यासारखी कामे या विभागातीलच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ठराविक कंत्राटदारांना दिली जात आहेत.
विशेष म्हणजे या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात येत आहे. ॲशबंडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कामांमध्ये स्पष्टपणे घोटाळा झाला आहे. ठराविक कंत्राटदारांकडून कामे मिळवून घेताना प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा आहे. थातूरमातूर कामे करून कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून दिला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या सर्व कारवायांविषयी मुख्य अभियंता अनभिज्ञ आहेत का, असा सवाल उपस्थित होतो आहे. स्थापत्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रतीनियुक्तीवर ठेवून त्यांच्यामार्फत कामे वाटप केली जात आहेत, हे जाणूनबुजून होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः या विभागातील अधिक्षक अभियंता यांनी विशिष्ट गटाचा प्रभाव वाढवला असून, त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना काम करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळत आहे.
प्रतीनियुक्तीच्या माध्यमातून झालेल्या घोटाळ्यांबाबत चौकशीची मागणी जोर धरत आहे. अधिक्षक अभियंता यांनी आतापर्यंत केलेल्या कामांची आणि संपत्तीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांवरून होत आहे. नंदेश्वर यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी आहे.
या विभागातील कंत्राटदारांमार्फत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळवलेले आर्थिक लाभ अत्यंत गंभीर असून, हे प्रकरण आता सार्वजनिक झाले आहे. ठराविक कंत्राटदारांना मर्जीतील कामे देऊन बाकी कंत्राटदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. यामुळे विभागात प्रचंड असंतोष आहे.
अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे विभागात कामांची गुणवत्ता कमी होत असून, जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. स्थायिक विभागाच्या या कारवायांविरुद्ध स्थानिकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या मते, या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यास मोठा भ्रष्टाचार उघड होईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.