चंद्रपूर : CSTPS च्या स्थापत्य विभागात भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला आहे. चंद्रपूरकरांना प्रदूषणाच्या विळख्यात ढकलून, येथे अधिकारी आणि ठेकेदारांची बेबंद राजवट चालू असल्याची चर्चा आहे. प्रदूषणाच्या संकटात होरपळणाऱ्या चंद्रपूर शहराच्या नागरीकांच्या आरोग्याचा विचार न करता, CSTPS चे अधिकारी मर्जीतील ठेकेदारांना काम देण्यासाठी बिनधास्तपणे लाचखोरीच्या यंत्रणेत गुंतल्याचे आरोप होत आहेत.
स्थापत्य विभागातील काही अभियंते आणि माध्यमातील काही पत्रकारांना मिळालेल्या 25 हजार रुपयांच्या रकमेतून लाचखोरीला आंधळे समर्थन देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. ‘पैसे घेऊन गप्प राहणे’ हेच अधिकाऱ्यांचे अनधिकृत धोरण असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे प्रदूषणासारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामस्वरूप, शहरातील नागरिकांना प्रचंड आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. दम्याचे त्रास, श्वसनाचे विकार, त्वचारोग आणि इतर गंभीर आजार आता चंद्रपूरकरांच्या जीवनाचा एक भाग बनले आहेत.
सतत तक्रारींना दाद न देणाऱ्या CSTPS प्रशासनावर नागरिकांचा रोष उफाळून आला आहे. “प्रदूषणाचे धोके आणि धुराच्या आगीत होरपळणारे जीवन, हेच आमचं भवितव्य आहे का?” असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रत्येक घरात धुराचा थर, राखेची माती, आणि विषारी वायूंनी भरलेल्या हवेत जगण्याचा अकल्पनीय त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हे सगळं असतानाही CSTPS च्या अधिकाऱ्यांनी मर्जीतील ठेकेदारांसाठी लाच घेणे आणि नियम धाब्यावर बसवून आपली तुंबडी भरणे चालूच ठेवले आहे.
हीच लोकप्रतिनिधींनी केलेली विश्वासघातकी भूमिका आहे. लोकांचे जीवन धोक्यात घालणारे हे अधिकारी आणि माध्यमाचे काही हस्तक आता चंद्रपूरच्या जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहेत. आता जनतेचा आवाज बुलंद झाला असून, या भ्रष्टाचारी व्यवस्थेचा बुरखा फाडून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
चंद्रपूरच्या नागरिकांच्या आरोग्यावर झालेल्या या हल्ल्यावर आता प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त लोकांनी केली आहे. अन्यथा, न्यायालयात जाऊन न्याय मिळवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.