चंद्रपूर : सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालीत बजाज विद्या भवनमध्ये मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या निर्देशिका ममताजी बजाज आणि मुख्याध्यापिका रुबिना शेख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी भाषा आणि तिच्या संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मराठी भाषेचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली. त्यानंतर वर्ग तिसरीचा विद्यार्थी यथार्थ ठाकरे याने मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे प्रभावी भाषण दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वल्लभ पांडे , रियांश नगराळे , प्रियांशी चवलढाल आणि स्पृहा गांगवे यांनी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले. विद्यार्थ्यांच्या कला आणि प्रतिभेला वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत वर्ग तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे गोडवे गाणारे सामूहिक गीत सादर केले, तर तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी तालबद्ध आणि मनमोहक नृत्याविष्कार सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे प्रदर्शन घडवले.
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेला नाट्यप्रयोग . या नाटकाद्वारे मराठीचे जतन व तिचे महत्व उत्कृष्ट पणे विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. व भविष्यात आपली मराठी भाषा जतन करण्याची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा अभिमान जागृत करणारे प्रयत्न शाळेमार्फत करण्यात आला. प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौतुक केले आणि मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश दिला. शाळेच्या शिक्षिका शीतल आभारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेच्या मराठी विभागाच्या शिक्षिका भाग्यश्री आईंचवार, शितल आभारे , राजश्री हिवराळे , वैशाली नन्नावरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विशेष मेहनत घेतली.