चंद्रपूरच्या विकास आराखड्यातील भूखंड बेकायदेशीर पद्धतीने विकण्याचा धंदा जोरात सुरू आहे. दस्तऐवजांचे चोख परिक्षण करूनच रजिस्ट्रेशन होते, असा सरकारचा दावा. पण प्रत्यक्षात इथे “सिस्टीमचं” वाटोळं झालंय. सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग-२ भोमेश्वर माहुरे आणि त्यांच्या दलाल टोळीने हा धंदा चांगलाच फोफावला आहे. लोकांच्या जमिनी कोट्यवधींना गिळंकृत करण्याचा हा डाव कित्येक वर्षांपासून सुरू आहे. आता मात्र यात एक मोठा स्फोट झालाय.
तुकूम महेश नगरचा भूखंड – जादूने झाला अकृषक!
तुकूम महेश नगर येथील रामकृष्ण को-ऑपरेटीव्ह गृहनिर्माण सोसायटीने सर्व्हे क्रमांक ९२ चा साडेपाच एकर भूखंड अकृषक करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यात चार एकर जमिनीला मंजुरी मिळाली, पण उरलेला एक एकर रिंगरोड आराखड्यात असल्याने तो अकृषक होऊ शकला नाही. नियम काय सांगतो? हा भूखंड तसाच राहायला हवा.
पण इथे सुरू झालं दलाल आणि निबंधक कार्यालयातील साहेबांचं “बिनधास्त” कारस्थान. ह्या टोळीने ही एक एकर जमीन अगदी कवडीमोल भावात खरेदी केली. मग खोटे नकाशे, बनावट कागदपत्रं जोडून रजिस्ट्रेशनही करून दिलं! एवढंच नव्हे तर हा भूखंड विकत घेताना सर्व्हे क्रमांक ९२/2 च्या नकाशाचा गैरवापर करण्यात आला. म्हणजे काय? रजिस्ट्रेशन करताना भूखंडाचा खोटा क्रमांक वापरून फसवणूक केली!
रजिस्ट्रेशनला आवश्यक कागदपत्रं नसताना हा व्यवहार मंजूर कसा झाला? तलाठी कार्यालयात फेरफारही झाला नाही, तरी रजिस्ट्री झाली कशी? याचा अर्थ स्पष्ट आहे – “खालपासून वरपर्यंत कुठेतरी पाणी फिरवलं गेलंय.” फक्त या एका व्यवहारातून लाखो रुपये कमावले गेले, आणि हीच पद्धत वापरून अनेक भूखंडांवर हीच खेळी रचली गेली.
भोमेश्वर माहुरे आणि त्यांच्या चमूने केवळ एक-दोन नव्हे, तर अशाच कित्येक बोगस रजिस्ट्र्या करून कोट्यवधींची संपत्ती जमवली. एवढंच नव्हे, तर ही संपत्ती कुठे ठेवायची याचा बंदोबस्तही आधीच केला गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालमत्तांची नोंद धंदरे यांच्या नावावर करण्यात आली आहे! म्हणजेच, नावं एकाचे, धंदा दुसऱ्याचा.
भ्रष्टाचाराची बाराखडी – आता उच्चस्तरीय चौकशीची मागणी
हा प्रकार उघड होताच, स्वराज्य रक्षक सामाजिक संघटनेने या प्रकरणात महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना निवेदन दिलं आहे. या घोटाळ्यातील बोगस रजिस्ट्र्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यात केवळ एका भूखंडाचा विषय नाही, तर संपूर्ण शहरातच अशा बनावट रजिस्ट्र्या होत आहेत. त्यामुळे भोमेश्वर माहुरेंच्या संपत्तीची सखोल चौकशी व्हावी, त्यांच्या कार्यालयातील सर्व व्यवहार तपासण्यात यावेत आणि दलालांची ही साखळी नष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.