घुग्घुस | आयपीएल IPL हंगाम जवळ येताच ऑनलाईन सट्ट्याचा सुळसुळाट वाढू लागला आहे. मोठमोठे बुकी, आंतरराष्ट्रीय नेटवर्क आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने हा सट्टा तरुणांपर्यंत पोहोचत आहे. अशाच एका प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने घुग्घुस येथे छापा टाकत ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या कारवाईत फक्त एकाच एजंटवर हात टाकण्यात आला असून, यामागचे मोठे मासे अजूनही हाताबाहेर असल्याचे चित्र आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, घुग्घुसमधील म्हातारदेवी परिसरात अंशुल रामबाबू रॉय हा आपले राहते घरी बसून ऑनलाईन बेटिंगचा गोरखधंदा करत आहे. सध्या सुरू असलेल्या ‘लिजेंड लीग’ स्पर्धेतील भारत-वेस्ट इंडीज सामन्यावर तो सट्टा घेत होता. पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून १ लाख रुपये किमतीचा आयफोन, ३ लाखांची रोकड आणि ३८ लाख रुपये किंमतीच्या ऑनलाईन बेटिंग आयडीसह एकूण ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन बेटिंगची ही केवळ एक छोटी कडी असून, यामागे मोठे नेटवर्क कार्यरत असते. सट्टेबाज मोठ्या प्रमाणावर तरुणांना या धंद्यात ओढत आहेत. सुरुवातीला आकर्षक नफ्याच्या आमिषाने युवक बेटिंग सुरू करतात, पण हळूहळू मोठ्या रकमेचा फटका बसतो. अनेक जण कर्जबाजारी होतात, काही गुन्हेगारीकडे वळतात, तर काही नैराश्यात जातात.
या अगोदरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर राजीक खान, निरज माखीजा, महेश अल्लेवार, प्रदीप गनगमवार यांसारखे मोठे बुकी भूमिगत झाले असल्याची माहिती समोर येत आहे. हे सट्टेबाज गेल्या अनेक वर्षांपासून ऑनलाइन बेटिंगचा मोठे रॅकेट चालवत आहे . त्यांच्याशी थेट संपर्क असलेल्या अनेक एजंटांवर कारवाई झाली असली, तरी मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे या सट्टेबाजांचे जाळे किती खोलवर आहे, याचा अंदाज येतो. आता हे मोठे मासे कधी गळाला लागणार, हा मोठा प्रश्न आहे.
या बेटिंग रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान
डिजिटल ट्रान्झेक्शन आणि आंतरराष्ट्रीय बुकींचा सहभाग यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड ठरत आहे. सायबर पोलिसांनी यासाठी अधिक सक्रिय राहण्याची गरज आहे.
सरकारनेही ऑनलाईन सट्टेबाजांविरोधात कठोर कारवाईसाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी होत आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, अन्यथा ऑनलाईन सट्ट्याचे हे जाळे आणखी खोलवर जाण्याची भीती आहे. घुग्घुसमधील कारवाईत मोठ्या प्रमाणात बेटिंगचा पैसा जप्त केला असला तरी यामध्ये केवळ स्थानिक एजंट गजाआड झाला आहे. मुख्य सूत्रधार मोकाट आहेत. पोलिसांनी केवळ स्थानिक बुकी नव्हे, तर संपूर्ण रॅकेट उध्वस्त करणे आवश्यक आहे. कारवाई महत्त्वाची असली, तरी मोठे मासे कधी गळाला लागणार, हा मोठा प्रश्नच आहे.