पावसाळ्यापूर्वी काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा
चिचपल्ली : चिचपल्ली येथील मामा तलाव अतिवृष्टीमुळे गेल्या ऑगस्ट महिन्यात फुटला आणि संपूर्ण गाव पाण्याखाली गेले. घरगुती साहित्य, शेतमाल आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. या घटनेला सात महिने उलटून गेले तरीही तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील सामाजिक कार्यकर्ते इमरान पठाण यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. सुरुवातीला केवळ पाहणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष कामासाठी कोणतीही हालचाल झालेली नाही. परिणामी, चिचपल्लीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर पुन्हा पावसाळ्यात जलप्रलयसारखी परिस्थिती ओढवू शकते. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे,” असा इशारा इमरान पठाण यांनी दिला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तलाव फुटल्यानंतर गावातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. या पूरपरिस्थितीमुळे जीवनावश्यक वस्तू, घरगुती साहित्य, तसेच पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तलावाच्या मजबुतीकरणासाठी आणि पुनर्बांधणीसाठी सरकारने तत्काळ निधी मंजूर करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा
“प्रशासनाने सात महिन्यांत केवळ आश्वासनांची खैरात केली. मात्र, प्रत्यक्ष कामाचा मागमूस नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलाव दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा इमरान पठाण यांनी दिला आहे.
चिचपल्लीतील नागरिकांसह सामाजिक संघटनांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने याप्रकरणी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.