व्यावसायिकाच्या 17 लाखांच्या स्त्रोताची चौकशी होणे आवश्यक
चंद्रपूर – भंगार व्यावसायिकाचे तब्बल 17 लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली, पण जेव्हा चंद्रपूर शहर पोलीसांनी या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा समोर आलेली सत्यता चक्रावून टाकणारी ठरली. डोळ्यात लाल मिरची पावडर फेकून लूट झाल्याचा दावा करणारा नौकरच या कटाचा सूत्रधार निघाला.
घटनाक्रम साधा वाटत होता. घूटकाळा वार्डातील भंगार व्यावसायिक हबीब मेमन यांनी आपल्या नौकराला 17 लाख रुपये घरी पोहोचवण्यास सांगितले. मात्र, काही वेळानंतर नौकर रफिक शेखने घाबरलेल्या अवस्थेत मालकाला सांगितले की, अज्ञातांनी त्याच्या डोळ्यात लाल मिरची पावडर फेकून पैसे हिसकावून नेले. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि तपासाला वेग आला.
पण पोलीसांनी घटनास्थळी पोहोचताच काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. रफिकच्या बोलण्यात वारंवार तफावत दिसून आली. पोलीस अधिक खोलात गेले, प्रश्नांची सरबत्ती केली आणि अखेर पोलीसांचा संशय खरा ठरला.
रफिक शेखने कबुली दिली की, ही लूट नव्हे, तर त्यानेच आपल्या लहान भाऊ शफिक शेखच्या मदतीने रचलेला कट होता. स्वतःच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून बनाव रचला होता. मात्र, पोलीसांच्या चाणाक्ष तपासापुढे त्याचा हा गेम फार काळ लपला नाही.
शहर पोलीसांनी दोन्ही भावांना अटक करून 17 लाखांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोपेड आणि दोघांचे मोबाईल असा एकूण 17 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
व्यावसायिकाच्या 17 लाखांच्या स्त्रोताची चौकशी होणे आवश्यक
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो — भंगार व्यावसायिकाकडे असलेली तब्बल 17 लाखांची रोख रक्कम. एवढी मोठी रक्कम कुठून आली? हा प्रश्न तपास अधिकाऱ्यांसमोर आहे.
पोलीसांनी या रकमेचा स्रोत शोधण्यासाठी व्यावसायिक हबीब मेमन यांची सखोल चौकशी करायला हवी. या रकमेचा स्रोत काय आहे, ती कोणत्या व्यवहारासाठी ठेवली होती, याची विचारणा झाली पाहिजे. रक्कम बँकेद्वारे काढली गेली होती की इतर कोणत्या माध्यमातून आली होती, हेही तपासले पाहिजे.
तसेच व्यावसायिकाच्या मागील आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करून त्यात काही संशयास्पद बाबी आढळतात का, हेही पाहिले पाहिजे. भंगार व्यवसायात मोठ्या प्रमाणावर रोकड व्यवहार केले जात असल्याने या व्यवहाराचे स्वरूप आणि कायदेशीरता यावरही पोलिसांचे लक्ष असले पाहिजे.
याशिवाय, मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम बाळगणे कायदेशीर आहे का, यासंदर्भातही तपास सुरू होणे आवश्यक आहे. पोलिसांनी आयकर विभागाला देखील यासंदर्भात माहिती द्यायला हवी आणि करचुकवेगिरी किंवा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचाही शोध घेतला पाहिजे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे करत आहेत. पण या घटनेने एक गोष्ट पुन्हा स्पष्ट केली – कितीही हुशारीने कट रचला तरी पोलीसांच्या तपासापुढे खोटं फार काळ टिकत नाही.
– चंद्रपूर प्रतिनिधी