कर्तव्यावर असताना सीआयएसएफ जवान पुंडलिक काळे यांचे निधन
चंद्रपूर : इंदिरानगर येथील रहिवासी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान पुंडलिक काळे (वय ४५) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, सहकारी आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
काळे मागील अनेक वर्षांपासून सीआयएसएफमध्ये कार्यरत होते. गुजरातमधील अंक्लेश्वर सुरत येथे ते कर्तव्यावर असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले.
मुलुखमर्द स्वभावाचे आणि कर्तव्यनिष्ठ असलेल्या काळे यांनी देशसेवेसाठी अखेरपर्यंत आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांच्या निधनानंतर अंक्लेश्वर सुरत येथे सीआयएसएफच्या सहकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव चंद्रपूर येथील इंदिरानगरमधील राहत्या घरी दुपारी १ वाजता आणण्यात येणार आहे.
आज दुपारी पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळी आणि सीआयएसएफचे सहकारी मोठ्या संख्येने त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहणार आहेत.
काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.