पोलिसांच्या कारवाईनंतरही पारस पुन्हा सक्रिय; युवकांचा विनाश अटळ?
चंद्रपूर | यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचा पारस अभियांत्रिकी शिक्षणासाठी चंद्रपूरमध्ये आला. क्रिकेटच्या प्रेमातून तो सट्टेबाजीच्या दलदलीत कसा फसला, याची ही कहाणी आहे. पारस आता चंद्रपूरचा मोठा बुकी म्हणून ओळखला जातो. 22 मार्चपासून सुरू झालेल्या आयपीएलमध्ये त्याने पुन्हा सक्रिय होत ‘Nice7777.fun’ या बेटिंग प्लॅटफॉर्मवरून आपल्या एजंट्सना कामाला लावले आहे. या माध्यमातून तो युवकांना सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढत आहे.
काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर पोलिसांनी व्यंकटेश लॉजवर छापा टाकून पारससह काही बुकींना ताब्यात घेतले होते. मात्र, या कारवाईनंतरही पारसने पुन्हा सट्टेबाजीच्या व्यवसायात उडी घेतली. पोलिसांचा वचक पूर्णपणे उडाल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, सद्यस्थितीत पारस बाहेरच्या राज्यात समुद्रकिनारी आरामात बसून आयपीएल सट्ट्याचे रॅकेट चालवत आहे. त्याचे एजंट देखील भूमिगत झाले आहेत.
Nice7777.fun सट्टेबाजी रॅकेटचा मुख्य सूत्रधार सिराज शेख असून तो सध्या दुबईत वास्तव्यास आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील सट्टेबाजीचे प्रमुख सूत्रधार राजीक खान, महेश अल्लेवार, संपत जागीड आणि नीरज माखिजा असल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटमधील एक महत्त्वाची कडी पारस आहे, जो चंद्रपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सट्टेबाजीचे नेटवर्क चालवत आहे.
अलीकडेच पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हे सर्व जण भूमिगत झाले असले तरी, Nice7777.fun च्या माध्यमातून सट्टेबाजीचा व्यवसाय अजूनही गुप्तपणे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पारसच्या सट्टेबाजी नेटवर्कवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अधिक चपळाईने आणि आक्रमकतेने काम करावे लागेल. पारससारखा बुकी मोकाट फिरतो, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी आता वरवरची कारवाई करून हात झटकणे धोकादायक ठरेल. पारसच्या माध्यमातून संपूर्ण सट्टेबाजी रॅकेटचा भांडाफोड करावा लागेल.
कोरोना काळापासून ऑनलाइन क्लासेस सुरू झाले आणि त्याचदरम्यान अगदी अल्पवयीन मुलांच्या हातातही मोबाईल आले. याचाच फायदा घेत हे आयपीएल सट्टेबाज मुलांना आकर्षित करून सट्टेबाजीच्या दलदलीत ओढत आहेत. ‘Nice7777.fun’ सारख्या बेटिंग प्लॅटफॉर्मवर युवकांना प्रलोभन दिले जात आहे. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामद्वारे युवकांना आयडी आणि पासवर्ड पुरवले जात आहेत. सायबर गुन्हे शाखेचे नियंत्रण नसल्याचे या घटनेतून समोर येत आहे. पारसचे एजंट्स चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांतही सट्टेबाजीचे नेटवर्क चालवत आहेत.
युवकांसाठी ही सट्टेबाजी मोठी समस्या बनली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांपासून तर महाविद्यालयीन युवकांपर्यंत अनेकजण सट्टेबाजीच्या दलदलीत अडकले आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापायी ते या अवैध व्यवसायात ओढले जात आहेत. पैशांचे नुकसान झाल्यावर हे युवक कर्जबाजारी होतात आणि काहीजण नैराश्यातही जातात.
पोलिसांसमोर आता मोठे आव्हान आहे. पारससारख्या बुकींपर्यंत पोहोचून त्यांच्या मागे असलेल्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. पारसच्या नेटवर्कचा पूर्ण छडा लावण्यासाठी सायबर गुन्हे शाखेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेऊन या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणारी पैशांची उलाढाल रोखणे गरजेचे आहे.
स्थानिक पातळीवर पारससारखे बुकी पोलिसांना थेट आव्हान देत असतील, तर आता पोलिसांनीही आक्रमक पावले उचलण्याची वेळ आली आहे. योग्य स्ट्रॅटेजी आखून आणि सायबर शाखेच्या मदतीने पारससह त्याच्या नेटवर्कला उध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी कोंडीत पकडून मुळापर्यंत जाऊन कारवाईची कुऱ्हाड चालवावी.
युवकांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या अशा सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता निर्णायक कारवाई करावी, अशी नागरिकांचीही मागणी आहे. प्रशासनाकडून यावर काय पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.