चंद्रपूर | शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि इंद्रजीत सावंत प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. मात्र, अटक होण्यापूर्वी कोरटकरने चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेचे माजी प्रमुख महेश कोंडावार यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे कोंडावार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Is Mahesh Kondawar in trouble in the Prashant Koratkar case?
महेश कोंडावार यांची नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. बदलीनंतर नाराज असलेल्या कोंडावार यांनी अद्याप नवी जबाबदारी स्वीकारलेली नाही. ते महिनाभरापासून रजेवर आहेत. अशा परिस्थितीत कोरटकरने त्यांची भेट घेतल्याची शक्यता कोल्हापूर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
प्रशांत कोरटकर 11 मार्च रोजी चंद्रपुरात मुक्कामी होता. त्यावेळी त्याने कोंडावार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर पोलिसांनी या कालावधीत कोरटकर ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये कोंडावार दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याप्रकरणी चंद्रपूर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना विचारले असता, हे प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे असल्याने आपण कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर पोलिसांचा तपास सुरू असून, कोंडावार यांचे नक्की काय कनेक्शन आहे, याबाबत लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता आहे.