• वडेट्टीवरांचा भाजप प्रवेश? चर्चांना उधान..!!
नागभीड : महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेत्यांमधला संवाद म्हणजे नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना, असा सवाल सगळ्यांना पडला.
भाजपचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार चंद्रपूर दौऱ्यावर होते. नागपूरवरून चंद्रपूरला जाताना त्यांनी नागभीडमध्ये थांबून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत चिमूरचे आमदार बंटी भांगडिया होते. ही भेट झाल्यानंतर ते चंद्रपूरकडे निघाले. पण, पळसगाव इथं मोठा राजकीय ट्विस्ट घडला. विजय वडेट्टीवार सरळ स्वतःच्या गाडीतून उतरले आणि थेट शेलार व भांगडिया यांच्या गाडीत चढले. तिघांनी एकत्र मूलपर्यंत प्रवास केला. हा प्रकार बघता, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
मूलला पोहोचल्यावर वडेट्टीवार यांनी शेलार आणि भांगडियांना त्यांच्या इथेनॉल प्रकल्पावर नेलं. बंद दाराआड गुपित चर्चा झाली, असं कळतंय. त्यामुळे वडेट्टीवार भाजपच्या उंबरठ्यावर तर नाही ना, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या, आता त्याला नवं खाद्य मिळालं आहे. यावर त्यांनी कित्येकदा खुलासे दिले असले, तरी राजकारणात काहीच पक्कं नसतं.
काही महिन्यांपूर्वी वडेट्टीवार अजित पवार यांच्या गोटात जाणार, अशी चर्चा रंगली होती. पण, अजितदादांनी त्यांच्या प्रभावाचा अंदाज घेतला आणि हा मामला तिथेच थांबला. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यामुळे त्यांचे राजकीय समीकरण अधांतरी राहिलं. आता भाजप नेत्यांसोबत झालेल्या या भेटीमुळे नवीन राजकीय दिशा तयार होते आहे का, यावर चर्चा झडते आहे.
वडेट्टीवार काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं बोललं जातं. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद मिळेल, अशी आशा त्यांनी ठेवली होती, पण तसं घडलं नाही. त्यातच त्यांच्या मार्गदर्शक असलेल्या अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे वडेट्टीवार यांचं मन ढवळलं गेलं आहे. काँग्रेसला सध्या सत्ता नाही, भविष्यात राजकीय गणित जुळवायचं असेल, तर पक्षबदल करावा लागेल, असं त्यांचं गणित दिसतंय.
भाजपमध्ये गेले, तर त्यांना मंत्रीपद आणि चंद्रपूर पालकमंत्रीपद मिळू शकतं. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावरही त्यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे एका गाडीत केलेला प्रवास आणि त्यानंतरची गुप्त बैठक ही सहज नाही. या घडामोडींमागे काहीतरी मोठं राजकीय गणित आहेच.
राजकीय वर्तुळात वडेट्टीवार यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते म्हणून मोठा दबदबा असला तरी काँग्रेसमध्ये त्यांच्या मनासारखं होत नाहीये. त्यामुळे ते नव्या समीकरणांचा विचार करत असल्याचं बोललं जातंय. त्यांचे काँग्रेसमध्ये राहणं पक्षासाठी फायद्याचं की अडचणीचं, यावर पक्षनेत्यांनी विचार करावा लागेल.
वडेट्टीवार यांची भाजप नेत्यांशी चर्चा होत असल्याच्या बातम्या याआधीही आल्या होत्या. पण त्यांनी त्या वैयक्तिक संबंध असल्याचं सांगून झटकल्या होत्या. पण धूर तसाच उठतोय, म्हणजे कुठेतरी जळतंयच. त्यामुळे पुढे काय होणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.