चंद्रपूर : रस्त्यावरील शिस्त राखण्यासाठी उन्हातान्हात अथवा पावसात अखंड ड्युटी बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांचं वेगळं रूप चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळालं. एका १५ दिवसांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतले असताना वाहतूक शाखेतील महिला पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करत बाळाचे प्राण वाचवले. ही घटना गुरुवारी शहरात घडली.
वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई पल्लवी सदनवार यांना गुरुवारी एका १५ दिवसांच्या नवजात बालिकेला तातडीने रक्ताची गरज असल्याची माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ रक्तदानासाठी पुढाकार घेतला. त्यांच्याकडून दिल्या गेलेल्या रक्तामुळे त्या बालिकेचे प्राण वाचले.नेहमीच रस्त्यावरील रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी कर्तव्य बजावणारे हे पोलीस, सामाजिक आपत्ती किंवा आरोग्याच्या आणीबाणीच्या प्रसंगीही मदतीस धावून येतात, याचं हे ठळक उदाहरण ठरलं आहे. सदनवार यांच्या या तत्परतेमुळे केवळ पोलिस दलातच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेतही त्यांचं कौतुक होत आहे. Traffic police woman donates blood for 15-day-old baby; A unique example of social commitment
वाहतूक पोलिसांचं काम हे फक्त रस्त्यावर उभं राहून वाहतूक नियंत्रण करणं इतकंच मर्यादित नाही, तर वेळप्रसंगी समाजासाठी त्याग करायला ते सदैव तयार असतात अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.सदनवार यांचं हे कार्य प्रेरणादायी ठरलं असून, अशा पोलीस कर्मचार्यांमुळेच समाजात माणुसकीचे नाते अधिक घट्ट होत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.