- चिमूर | प्रतिनिधी
- निखिल मोहिणकर
चिमूर शहरात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सोमवारी रात्री उशिरा शहरात मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने चिमूर पोलिस ठाण्याला घेराव घालत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत ठिय्या मांडला. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. या लाठीमारात काही नागरिक आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले. रात्री तीनपर्यंत शहरात मोठा गोंधळ उडाला होता. सध्या शहरात तणावपूर्व शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चिमूर शहरातील एका वसाहतीत राहणाऱ्या १३ आणि १० वर्षीय दोन मुली शेजारी राहत असल्याने एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. त्या सोबतच शिक्षण घेत होत्या आणि रोज घरासमोर खेळत असत. सोमवारी रात्री १३ वर्षीय मुलीने आपल्या आईला दोघींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची धक्कादायक माहिती दिली. या मुलीने सांगितले की मार्च महिन्यात मोहल्ल्यातीलच आरोपी रसिद रूस्तम शेख (नड्डेवाला) याने खाऊ देण्याच्या बहाण्याने त्यांना घरी बोलावले. घरात नेताच दोघींवर आळीपाळीने अत्याचार केला.
या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा आरोपी नसिर वजीर शेख (गोलावाला) यानेही तसाच खाऊ देण्याचा बहाणा करून दोघींना घरात बोलावले आणि त्यांच्यावर अत्याचार केला. हे प्रकार एकदाच नव्हे तर सप्टेंबर महिन्यापासून वेळोवेळी सुरू असल्याची माहिती १३ वर्षीय मुलीने दिली. ही बाब कळताच पीडितेच्या आईने रात्री साडेदहाच्या सुमारास चिमूर पोलिस ठाण्यात जाऊन दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आणि कठोर कारवाईची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच चिमूर शहरात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी करत निषेध सुरू केला. आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी जोरदार मागणी करत जमावाने ठाण्यासमोर ठिय्या दिला. तणाव वाढत असल्याचे लक्षात घेत दोन्ही आरोपींनी स्वतःहून चिमूर पोलिस ठाण्यात हजेरी लावून शरणागती पत्करली. मात्र, जमावाचा संताप इतका प्रचंड होता की त्यांनी पोलिसांवरच रोष व्यक्त केला. रात्री साडेअकराच्या सुमारास काही आक्रमक नागरिकांनी पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. यामध्ये ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. दगडफेकीत एक महिला पोलिस आणि एक अन्य पोलिस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती चिघळल्याचे लक्षात घेत पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आले. जखमी पोलिसांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.
लाठीचार्ज झाल्याने जमाव आणखी भडकला. संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर टायर जाळून रोष व्यक्त केला. पाहता पाहता नागरिकांची संख्या पाचशे ते सहाशे पर्यंत पोहचली. प्रचंड गोंधळामुळे चिमूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी भिसी, नागभीड, शेगाव येथून अतिरिक्त पोलिस दल मागवले. चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथकही घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षकांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या विविध पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घालून ठिय्या दिला. आरोपींना आमच्याकडे सोपा, त्यांना फाशी द्या, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशा मागण्या मोठ्या आवाजात होत्या.
या घटनेमुळे चार तास पोलिस ठाण्याचा वेढा कायम राहिला. पोलिस ठाण्याच्या आजूबाजूच्या भागात देखील नागरिकांचा जमाव वाढत गेला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी संयम राखत परिस्थिती हाताळली. अखेर रात्री तीन वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि दंगा नियंत्रण पथकाच्या मदतीने जमाव पांगवण्यात यश आले. सध्या चिमूर शहरात परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी तणावपूर्ण शांतता आहे. आरोपी आणि पीडितांच्या घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये अजूनही संताप आहे. संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी स्थानिक नागरिक जोरदार मागणी करत आहेत.